पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) यांनी मुळशी तालुक्यातील भुकूम येथे शुक्रवारी, १६ मे २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैष्णवीच्या आई-वडिलांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत, हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून तिचा छळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता, जाऊ करिश्मा आणि दीर सुशील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता या प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही संताप व्यक्त केला जात आहे.
मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “२०२५ मध्ये अजित पवार यांच्या पक्षातील नेते हुंड्यासारख्या घृणास्पद प्रथेला खतपाणी घालत आहेत, हे अत्यंत लज्जास्पद आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेतून महिलांना १५०० रुपये द्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच नेत्यांनी हुंड्यासाठी छळ करायचा, ही नीच मानसिकता आहे,” असे शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे. शालिनी ठाकरे यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
“अजित पवार आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी. एरव्ही चित्रपटात एखादा बोल्ड सीन आला की बंदी आणि कारवाईची मागणी करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आता कुठे आहेत? ह्या प्रकरणी महिला आयोगाने तातडीने कारवाई करावी आणि जनजागृती मोहीम राबवावी अशी माझी मागणी आहे. ह्या प्रकरणी कठोर कारवाई झालीच पाहिजे”, असे शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, वैष्णवी आणि शशांक यांचा २०२३ मध्ये प्रेमविवाह झाला होता, मात्र लग्नानंतर लगेचच सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केला, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास बावधन पोलीस करत असून, राजेंद्र हगवणे सध्या फरार असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या
-Pune: हवाई दलाच्या जवानाच्या वेशात केली फसवणूक; पुणे पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
-‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून ‘वासंतिक चंदन उटी’ महोत्सव आयोजित
-इंद्रायणी नदीपात्रातील ‘त्या’ ३६ बंगल्यांवर पालिकेने चालवला बुलडोझर; कोट्यावधींचे बंगले जमीनदोस्त
-पुण्यातील ‘त्या’ बहुचर्चित रस्त्याला स्थगिती; नेमकं कारण काय?