पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात वाढती गुन्हेगारी पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. मागील काही वर्षांपासून गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, भरदिवसा होणारे हल्ले, खून आणि दहशतीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अशातच दत्तवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोयता गँगने एका तरुणावर भररस्त्यात हल्ला केला, जो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दत्तवाडी परिसरात तीन ते चार जणांनी एका तरुणावर कोयता आणि इतर धारदार हत्यारांनी हल्ला चढवला. सीसीटीव्ही फुटेजनुसार, हल्लेखोरांनी तरुणाचा पाठलाग केला, तर तो जीव वाचवण्यासाठी धावत होता. रस्त्याच्या वळणावर त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्याच क्षणी हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. हल्लेखोरांपैकी एकजण “धर त्याला, पकड त्याला” असे ओरडत होता. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समजते. हल्लेखोरांनी हातातील कोयत्याचा वापर करून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेने पुणे पोलिसांसमोर कोयता गँगच्या दहशतीला आळा घालण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दत्तवाडीतील या हल्ल्याने पुन्हा एकदा शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
महत्वाच्या बातम्या
-छत्रपती संभाजी महाराज जयंती: पालिका प्रशासनाची उदासीनता, शंभूप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी
-PMC सुरक्षा रक्षक निविदा: प्रशासनाचा ‘तो’ नियम कायमच; विशिष्ट ठेकेदारासाठी नियमांचा खेळ?