पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पुण्यासह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणेच्या वडिलांनी सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी आपल्या मुलीला मारहाण केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. वैष्णवीच्या मृतदेहावर देखील मारहाणीचे व्रण दिसून आले होते. या प्रकरणी आता बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याच्या एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे वैष्णवीच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे यांच्या मुलाला लग्नात हुंडा म्हणून ५१ तोळे सोने, ७.५ किलो चांदीची ताटे आणि फॉर्च्युनर कार दिली होती.
राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत त्यामुळे या वैष्णवी आणि शशांकच्या लग्नाला अजित पवारांनी हजेरी लावली होती. शशांक आणि वैष्णवी यांचा प्रेमविवाह असून देखील तिच्या वडिलांनी या दोघांचा शाही विवाह सोहळा करुन दिला. एवढंच नाही तर लग्नात ५ तोळे सोने, चांदीची भांडी आणि मुख्य म्हणजे फॉर्च्युनर कार दिली होती. यावेळी कार पाहून अजित पवारांनी राजेंद्र हगवणे यांना ‘ही कार त्यांनी दिली की तुम्ही मागितली’, असा खोचक प्रश्न देखील विचारला होता.
काय म्हणाले होते अजित पवार?
‘अजित पवार वैष्णवीच्या लग्नाला आले होते. ते अर्धा-पाऊण तास लग्नात थांबले होते. ते वैष्णवी आणि शशांक यांना आशीर्वाद द्यायला आले होते. लग्नात हुंडा म्हणून देण्यात आलेल्या फॉर्च्युनर गाडीकडे पाहून अजित पवार यांनी राजेंद्र हगवणे यांना विचारले होते की, ही गाडी तुम्ही मागितली आहे की त्यांनी दिली आहे. तेव्हा तिथे अनेकजण उपस्थित होते. अजित पवारांनी राजेंद्र हगवणेंना विचारलेला प्रश्न ऐकून तेव्हा सगळेच हसले. अजित पवार यांनी खोचकपणे तो प्रश्न हगवणेंना विचारला होता’, असे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले आहे.
हगवणेंच्या मोठ्या सुनेलाही केली होती मारहाण
राजेंद्र हगवणे यांचे अजितदादांशी जवळचे संबंध आहेत. हगवणेच्या मोठ्या सूनबाबतही असाच प्रकार घडला होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये तिने पोलिसांत तक्रार दिली होती. ती केस अजूनही सुरु आहे. मात्र, ते प्रकरण दाबण्यात आले. हगवणेंची मोठी सून माझ्या मुलीच्या अंत्ययात्रेला आली होती. तिनेदेखील वैष्णवीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आम्हाला सांगितले, असेही वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले आहे.
‘हगवणे कुटुंबियांना अटक करुन दादांनी माझ्या मुलीला न्याय द्यावा’
अजित पवार यांना या सगळ्याची कल्पना असावी. अजित पवार यांचे पाठबळ असल्यानेच हगवणे यांच्या मोठ्या सूनेची केस ओपन होत नाही. आमची अजितदादांपर्यंत ओळख नाही. मात्र, आम्ही अजित पवारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करु. हगवणे कुटंबियांना अटक करुन अजितदादांनी माझ्या मुलीला न्याय द्यावा, अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
-पाकिस्तानचा नारा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल, कॉलेजने काढून टाकलेली तरुणी म्हणते…
-महिन्यात एक नाही दोन नाही तर तब्बल २५ पुरुषांशी केलं लग्न, अखेर ‘त्या’ रात्री पितळ उघड पडलंच
-काँग्रेसमधून आलेल्या धंगेकरांची शिवसेनेत बढती; एकनाथ शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी
-भुजबळ मंत्रिमंडळात! भाजपचा राजकीय डाव की अजितदादांचा नाईलाज?