पुणे : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुण्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीतील समिकरणांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपने 2017 मध्ये जिंकलेल्या 105 जागांवर आधीच दावा ठोकल्याने युतीतील मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर असून त्यांनी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली. यावेळी महापौर आपलाच होणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्यावेळी जिंकलेल्या 105 जागा पुन्हा मिळवण्यासाठी तयारीला लागण्याची सूचना यावेळी त्यांनी केली आहे. तसेच थोडक्यात गेलेल्या जागांवरही लक्ष केंद्रित करण्याची सूचना फडणवीस यांनी दिल्याची माहिती पुढे आली आहे.
2017 मध्ये भाजपने स्वबळावर तब्बल 100 जागा जिंकल्या होत्या. अलीकडेच शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे ही संख्या 105 वर गेली आहे. भाजपने याच आधारे युतीपूर्वीच या जागांवर दावा कायम ठेवला आहे.
या बैठकीत फडणवीसांनी महायुतीच्या म्हणून लढण्याबाबत सूचक संकेत दिले असले, तरी 105 जागांची अट टाकल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा फॉर्म्युला कितपत स्वीकारार्ह वाटतो, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतील युतीचं भवितव्य आणि सत्ता समीकरणे भाजपच्या या आग्रही भूमिकेवरच ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
-छत्रपती संभाजी महाराज जयंती: पालिका प्रशासनाची उदासीनता, शंभूप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी
-PMC सुरक्षा रक्षक निविदा: प्रशासनाचा ‘तो’ नियम कायमच; विशिष्ट ठेकेदारासाठी नियमांचा खेळ?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पुण्यात कोण करणार नेतृत्व? ‘या‘ नावाची चर्चा, पण दादांची पसंती कोणाला?