पुणे : पुणे शहरातील विधी महाविद्यालय रस्त्यावरील दामले पथ परिसरात एका तरुणाला त्याच्या मैत्रिणीसोबत कारमध्ये बसलेले पाहून दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी धमकावून त्याच्याकडून 20 हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे कारण देत परिमंडळ एकचे प्रभारी पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी संबंधित दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.
ही घटना मंगळवारी रात्री घडली, जेव्हा एक तरुण आपल्या मैत्रिणीसोबत कारमध्ये गप्पा मारत बसला होता. यावेळी रात्रगस्तीवर असलेले पोलिस कर्मचारी गणेश देसाई आणि योगेश सुतार तिथे आले. त्यांनी तरुणाला धमकावले की, त्याच्याविरुद्ध तक्रार आहे आणि पोलिस ठाण्यात प्रकरण टाळायचे असेल तर 20 हजार रुपये द्यावे लागतील. तरुणाकडे तेवढी रक्कम नसल्याने पोलिसांनी त्याला दुचाकीवर बसवून कमला नेहरू पार्क परिसरातील एका एटीएमवर नेले आणि तिथे त्याच्याकडून 20 हजार रुपये काढून घेतले.
या घटनेने घाबरलेल्या तरुण आणि त्याच्या मैत्रिणीने थेट डेक्कन पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही कर्मचाऱ्यांची चौकशी केली. या प्रकरणात दोन्ही पोलिसांनी वरिष्ठांना माहिती देणे आवश्यक होते, परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यांच्या या कृतीमुळे पोलिस दलाची प्रतिमा डागाळल्याचा ठपका ठेवत उपायुक्त पिंगळे यांनी गणेश देसाई आणि योगेश सुतार यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले.
ही कारवाई पोलिस दलात चर्चेचा विषय बनली आहे. अशा प्रकारच्या गैरवर्तनामुळे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास कमी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पोलिस दलाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यात व्यावसायिकाने संपवले जीवन, धक्कादायक कारण आले पुढे
-हिंदी भाषा सक्तीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांना कायदेशीर नोटीस
-‘जात-पात ना धर्म रे माझ्या विठुराया पाशी’; पुण्यातील हा मुस्लिम करतोय वारकऱ्यांची सेवा
-पुण्यातील धक्कादायक प्रकार; दारु प्यायचा म्हणून कामावरुन काढून टाकलं, त्याचाच राग मनात धरला अन्…
-आळंदीत कत्तलखाना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं काय होणार