पिंपरी-चिंचवड : नुकतीच छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासकीय तारखेनुसार राज्यभरात साजरी करण्यात आली. या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमधील संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानात असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शंभूप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. सामाजिक संघटना, इतिहासप्रेमी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनीही येथे येऊन महाराजांना नमन केले. या ठिकाणी शंभूप्रेमींच्या आग्रहाखातर महाराष्ट्र शासनाच्या आदेशानंतर उभारलेला हा भव्य पुतळा आहे. यंदा प्रथमच पालिकेच्या माध्यमातून शासकीय जयंती साजरी होत असताना, महाराजांचे शौर्य, धाडस, विद्वता आणि बलिदान यांचा इतिहास युवकांसमोर यावा, यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती.
स्थानिक नगरसेवक आणि आरंभ सोशल फाऊंडेशनद्वारे गेले पाच वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन करणारे उपमहापौर तुषार हिंगे यांनीही याबाबत पालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. मात्र, पालिका प्रशासनाने या मागणीची दखल न घेता कोणतेही नियोजित कार्यक्रम आयोजित केले नाहीत. पुतळा आणि चौथऱ्याची रंगरंगोटी अपेक्षित प्रमाणात झाली नव्हती. पुतळ्याचा मूळ कांस्य रंग बदलून मागील वर्षी सोनेरी रंग देण्यात आला होता, परंतु त्याचे काही भाग उखडले होते. फुलांची सजावट अर्धवट होती, पुरेशी फुले आणि हार उपलब्ध नव्हते, तसेच परिसराची स्वच्छताही नीट झाली नव्हती.
पूर्वनियोजित काही कार्यक्रमही पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे होऊ शकले नाहीत. पालिकेच्या या उदासीनतेमुळे शंभूप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला, पण जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. विशेष म्हणजे, आयुक्त शेखर सिंह यांच्यासह एकही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिला नाही.
या प्रकारामुळे शंभूप्रेमींनी पालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि बलिदान भारतवर्षात अविस्मरणीय आहे, परंतु पालिकेच्या उदासीनतेमुळे जनभावना दुखावल्याचे शंभूप्रेमींचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीमुळे प्रशासनावर कोणाचाही अंकुश नसल्याचे या घटनेने अधोरेखित झाले, अशी भावना विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी व्यक्त केली. आयुक्त शेखर सिंह यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची पूर्वसूचना असतानाही दुर्लक्ष केल्याने त्यांना निलंबित करण्याची मागणी शंभूप्रेमींनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
-PMC सुरक्षा रक्षक निविदा: प्रशासनाचा ‘तो’ नियम कायमच; विशिष्ट ठेकेदारासाठी नियमांचा खेळ?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पुण्यात कोण करणार नेतृत्व? ‘या‘ नावाची चर्चा, पण दादांची पसंती कोणाला?
-Local body Election: इच्छुकांची धाकधूक वाढवणारी बातमी, निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला महत्वाचे आदेश