पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) नुकतीच तिकीटाच्या दरात वाढ केली आहे. त्यातच आता बसमधून फुकट प्रवास करणाऱ्या तसेच तिकीट घेण्यास विलंब करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नवीन मोबाइल ॲप आणि ऑनलाइन तिकीट प्रणाली विकसित करण्यात आली आहे, तर ॲपमधील तांत्रिक अडचणी किंवा सुट्या पैशांवरील वाद टाळण्यासाठी अत्याधुनिक ई-मशिन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवाशांनी बसथांब्यावरून बसमध्ये बसतानाच तिकीट घेणे बंधनकारक करण्यात आले असून, वेळेत तिकीट न घेणाऱ्यांवर दंड आकारला जाईल, असा इशारा पीएमपी प्रशासनाने दिला आहे. ऑनलाइन तिकीट प्रणालीत नेटवर्कमुळे विलंब झाल्यास वाहकाकडून ई-मशिनद्वारे रोखीने तिकीट घ्यावे, असेही सांगण्यात आले आहे.
पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीची ‘जीवनवाहिनी’ असलेल्या पीएमपीला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी २०२४-२५ या आर्थिक वर्षात संचलन तोटा ७६६ कोटींवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी मार्ग विस्तार, नवीन मार्गांवर बससेवा सुरू करणे, ऑनलाइन तिकीट प्रणालीतील त्रुटी दूर करणे आणि ई-मशिनसह नवीन उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
‘प्रवाशांकडून गर्दी आणि ठरावीक अंतरावर असणारे बसथांबे याचा गैरफायदा घेतला जात असल्याने प्रवासी ज्या बस थांब्यावर बसेल तेथूनच ऑनलाइन तिकीट काढणे अनिवार्य करण्यात आले आहे’, असे पीएमपीएमएलचे सह व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर म्हणाले आहेत. ‘या नव्या नियमांमुळे प्रवाशांना तिकीट खरेदी करणे सोयीचे होईल आणि फुकट प्रवासाला आळा बसेल. प्रवाशांनी या नवीन प्रणालीचा लाभ घेऊन सहकार्य करावे’, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-Pune: हवाई दलाच्या जवानाच्या वेशात केली फसवणूक; पुणे पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
-‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून ‘वासंतिक चंदन उटी’ महोत्सव आयोजित
-इंद्रायणी नदीपात्रातील ‘त्या’ ३६ बंगल्यांवर पालिकेने चालवला बुलडोझर; कोट्यावधींचे बंगले जमीनदोस्त
-पुण्यातील ‘त्या’ बहुचर्चित रस्त्याला स्थगिती; नेमकं कारण काय?