पुणे : विधी महाविद्यालय आणि कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीने स्थगिती दिली आहे. समितीने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेवर निर्णय होईपर्यंत कोणतेही बांधकाम करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे रस्त्याचे काम रखडणार असल्याचे निश्चित झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या पथ विभागाकडून या रस्त्याचे नियोजन सुरू आहे, परंतु पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत.
या रस्त्याच्या विरोधात २०२४ मध्ये वेताळ टेकडी बचाव समितीने सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीकडे अर्ज केला होता. रस्त्यामुळे डोंगर उतार आणि डोंगरमाथ्याचे नुकसान होऊन पर्यावरणाची हानी होईल, असा दावा त्यांनी केला. या अर्जाची दखल घेऊन समितीने बांधकामावर स्थगिती आणली आहे. तीन महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने नागरी चेतना मंचाची याचिका फेटाळून स्थगिती उठवली होती, ज्यामुळे महापालिकेला दिलासा मिळाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही.
या निर्णयामुळे महापालिकेला कोणतेही बांधकाम करता येणार नसल्याचे वेताळ टेकडी बचाव समितीच्या सदस्य प्राजक्ता दिवेकर यांनी सांगितले. पर्यावरण संरक्षणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी या स्थगितीचे स्वागत केले आहे, तर वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बालभारती ते पौड फाटा रस्त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होणार असल्याने स्थानिक रहिवाशांचा सुरुवातीपासूनच याला विरोध होता. हा रस्ता करणे महत्त्वाचे कसे आहे, हे पटवून देण्यास महापालिका वारंवार अपयशी ठरली आहे. पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या या रस्त्याला नागरिकांचा विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीने दिलेल्या निर्णयामुळे नागरिकांना आणि पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे, असे राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
-प्रेयसीने दिला लग्नाला नकार, त्याने थेट इनटिमेट व्हिडीओ पॉर्न साइटवर टाकला
-नालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा; मुरलीधर मोहोळांचे आदेश
-भाजप खासदार मेधा कुलकर्णींना स्वपक्षीय नेत्याची धमकी, म्हणाले “आधी तिकीट कापलं आता…”
-रक्षकच निघाले भक्षक! वाघोलीत पोलिस अधिकाऱ्यानेच केला जमीन घोटाळा, चौघांवर गुन्हा दाखल