पुणे : नाशिकमध्ये एका भोंदू ‘कॅप्टन’ने मंत्र-तंत्र आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणारा अशोककुमार एकनाथ खरात याला पोलिसांनी बुधवारी (१८ मार्च) अटक केली असून, न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एका महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेला त्याचा भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे.
कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टीज कार्यालयात हा प्रकार घडला. सिडको परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय पीडितेला विवाह जुळत नसल्याने तिच्या मेहुण्याने मार्च २०१९ मध्ये खरातकडे नेले. खरातने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत मंत्र-तंत्राद्वारे सर्व समस्या सोडवू शकतो असा विश्वास निर्माण केला. २०२० मध्ये कोरोनामुळे विवाह लांबल्यानंतर २०२१ मध्ये लग्न ठरल्यावर त्याने ‘खडा’ (रत्न) घालण्याचा सल्ला दिला. पीडितेने खडा काढल्यावर लग्न मोडले. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये भीती निर्माण झाली.
खरातने मोठ्या रकमेचे नवे खडे देत पुन्हा विधी करण्यास भाग पाडले. सिन्नर येथील मंदिरात पूजा करण्याच्या नावाखालीही पैसे उकळले. “खडा काढल्यास लग्न मोडेल”, “विधी न केल्यास पतीचा जीव जाईल” अशा धमक्या देत त्याने पीडितेवर मानसिक दबाव टाकला. २०२२ मध्ये खरातने प्रसादाच्या नावाखाली पेढा आणि खारट कडवट चवीचे पाणी प्यायला दिले. गुंगी आल्यानंतर बलात्कार केला. २०२३ मध्येही पतीला चेंबरबाहेर बसवून अत्याचार केला.
नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत “कोणाला सांगितल्यास जीव मारेल”, “चारित्र्य खराब करून आयुष्य उद्ध्वस्त करेल” अशा धमक्या देत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. १५ मार्च २०२६ रोजी पीडितेच्या मेव्हण्याला खरातच्या भोंदूगिरीबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर १७ मार्च रोजी पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. सहाय्यक आयुक्त संदीप मिटके आणि गुन्हे शाखेच्या पथकाने कर्मयोगीनगर येथील ‘तृप्तबाला’ बंगल्यावर छापा टाकून खरातला अटक केली. तपासादरम्यान त्याच्या कार्यालयातून पेनड्राईव्हसह महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. या पेनड्राईव्हमध्ये अनेक व्हिडिओ आढळले असून, त्यांची तपासणी सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुणे-मुंबई एक्स्प्रेसवे’ला पर्यायी महामार्ग मिळणार! वाहतूक कोंडीचा ताण होणार कमी
-कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या सागर मोहोळकरचा मृत्यू
-आता गॅस सिलेंडर मिळणार पण फक्त OTP वरच! जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर निर्देश
-पुण्यात महिलेचा मृतदेह अन् तोही विवस्त्र अवस्थेत; CCTV मधून भयानक दृश्य
-दहावी पेपरफुटी प्रकरणात ट्विस्ट; ६०० रुपये घेऊन फसवणूक, १८ वर्षीय चैतन्य शेंडेला अटक














