पुणे : “समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी वारंवार सरकारी कार्यालयांचे फेरे मारावेत” ही आपल्या व्यवस्थेतील जुनी तक्रार असली, तरी त्यातून मार्ग काढत कसबा मतदारसंघात एक वेगळीच सुरुवात आमदार हेमंत रासने यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचं दिसत आहे. रासने यांनी आज सकाळच्या प्रहरी नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी एक संयुक्त पाहणी दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि वीजपुरवठा यांसारख्या मुलभूत सुविधांवरील तक्रारींवर जागेवरच उपाय शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. पथविभागाचे अनिरुद्ध पावसकर, मलनिसारणचे मुख्य अभियंता संतोष तांदळे, अतिक्रमण विभागाचे संदीप खलाटे, परिमंडल 5 चे उपआयुक्त सुनिल बल्लाळ, आकाश चिन्ह उपायुक्त श्री. ठोंबरे, भवानी पेठचे सहआयुक्त किसन दगडखेर, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे सुहास जाधव, महावितरणचे तरंग यांच्यासह भाजपचे कसबा मंडलाध्यक्ष अमित कंक, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही दौऱ्यात सहभागी झाले होते.
“नागरिकांच्या समस्या केवळ नोंदवून घेणे पुरेसे नाही. त्या प्रत्यक्ष पाहून तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. हेच या दौऱ्याचे वैशिष्ट्य आहे,” असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी सांगितले. तसेच नालेसफाई व ड्रेनेज कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले.
“गेल्या पाच महिन्यांपासून नियमितपणे अशा दौऱ्यांचे आयोजन करून नागरिकांचे प्रश्न ऐकले जात आहेत. प्रशासनाच्या सक्रिय सहभागामुळे अनेक समस्या तात्काळ सोडवण्यात आल्या असून, उर्वरित समस्यांचेही लवकरच निराकरण केले जाईल,” असे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले.
या धडक मोहिमेमुळे प्रशासन आणि नागरिकांमधील अंतर कमी होत असून, ‘कामासाठी सरकारी दारात जा’ या ठोकताळ्याला छेद देत प्रशासनच आता नागरिकांच्या दारात पोहचल्याने या उपक्रमाची शहरभर चर्चा रंगली आहे.
दरम्यान, स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा अभियानांतर्गत कसब्यातील बहुतांश क्रॉनिक स्पॉट बंद करण्यात आले असून या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावित दोन भुयारी मार्गांचा डीपीआर तयार करण्याचे काम देखील सुरू झाले आहे. रस्त्यावरील अनधिकृत फ्लेक्स, अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने व्यापक मोहीम राबवण्याची सूचना यावेळी रासने यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
-तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का?; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
-“आमच्या भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ने घेतला”- हेमंत रासने