पुणे : भाजपच्या नेत्या, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी २ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी केली. या मागणीवरुन मेधा कुलकर्णी यांच्यावर शहरातील मोठा वाद पेटल्याचे पहायला मिळाले. ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा यावर आक्षेप घेण्यात आला. ठाकरे सेनेने देखील विरोध केल्याचे पहायला मिळाले.
पुणे शहरात शिवसेनेच्या ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांकडून मेधा कुलकर्णींंविरोधात पोस्टर लावल्याचे पहायला मिळाले. पोस्टरवर आक्षेपार्ह फोटो लावून ‘कोथरुडच्या बाई, आपणांस नामांतरची एवढी खुमखुमी आली असेल तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे’, असा आशय पोस्टरवर टाकण्यात आला आहे. यावरुन ब्राह्मण सभेने मेधा कुलकर्णी यांची बदनामी केल्याप्रकरणी आता राज्य महिला आयोगाला पत्र लिहले आहे.
नेमकं काय आहे पत्रात?
मेधा कुलकर्णी यांच्या बदनामी करण्यासाठी म्हणून जे बॅनर आज जाहीररित्या पुणे शहरात लावले गेलेले आहेत. त्याबद्दल महाराष्ट्र ब्राह्मण सभा महिला आघाडीकडून राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णींबद्दल समस्त महिलांमध्ये नितांत आदर आहे आणि त्या भविष्यात राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक प्रतिनिधिक उदाहरण आहेत. आणि हा समस्त महिला वर्गाचा अपमान आहे. असं असताना आमच्या नेतृत्वाला अशा पद्धतीने 2025 मध्येही जाहीरपणे बदनाम करण्याचा हा जो प्रयत्न झाला, त्याबद्दल महाराष्ट्र ब्राह्मण सभा महिला आघाडी कडून आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करतो आहोत, असे पत्रात नमूद करण्यात आले. तसेच ‘आमची ही तक्रार महिला आयोगाने तातडीने दाखल करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जावी’, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.
रुपाली चाकणकरांनी घेतली तात्काळ दखल
विद्या घटवाई यांनी महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीनंतर महिला आयोगाच्या आध्यक्षा रुपाली चाकणकरांनी बॅनर लावणाऱ्या संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. महिला आयोगाला केलेल्या अर्जानंतर ‘राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या बदनामी करण्यासाठी जाहीररित्या पुणे शहरात बॅनर लावण्यात आले. याबाबत संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी’, असे आदेश चाकणकरांकडून देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-पुणेकरांचा मेट्रो प्रवास आता सुसाट, विस्तारित मार्गाला मोदी सरकारची मंजुरी
-हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं
-पुणे महापालिकेची अभय योजना नाही; मिळकतकर सवलतीची मुदत संपण्यास पाच दिवस शिल्लक
-डिलिव्हरी बॉयचा हात तोडला, तरीही पोलिसांकडून आरोपींना जामीन, नागरिकांचा संताप