पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण झाले असतानाच, भवानी पेठेत आणखी एक खळबळजनक खुनाची घटना घडली आहे. ५ सप्टेंबर २०२५ रोजी आयुष गणेश कोमकर (वय १८, रा. लक्ष्मी कॉम्प्लेक्स, खाकसार मस्जिदमागे, नवरंग मित्र मंडळाजवळ, भवानी पेठ) या तरुणावर आंदेकर टोळीतील तीन शूटरांनी गोळीबार करून त्याचा खून केला. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात आयुषच्या आई कल्याणी गणेश कोमकर (वय ३७) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, आणि यश सिद्धेश्वर पाटील (सर्व रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
वनराज आंदेकर यांचा १ सप्टेंबर २०२४ रोजी टोळीच्या वर्चस्वातून खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी २३ जणांना अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. सध्या ते सर्व कारागृहात आहेत. या खुनाचा बदला घेण्यासाठी आणि पूर्ववैमनस्यातून बंडू अण्णा आंदेकर आणि इतरांनी खुनाचा कट रचला. यश पाटील आणि अमन पठाण यांनी आयुष कोमकरवर गोळीबार करून त्याचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हा गोळीबार आयुषच्या घराजवळील पार्किंगमध्ये गणेश विसर्जनाच्या एक दिवस आधी घडला.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तादरम्यान गुन्हे शाखेचे पथक या खुनातील आरोपींचा शोध घेत होते. शनिवारी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या आरोपींच्या चौकशीतून खुनामागील कट आणि कारस्थानाचा पुढील तपशील समोर येण्याची शक्यता आहे. यापूर्वीही खुनाचा कट रचणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. आंदेकर टोळी आणि सोमा गायकवाड यांच्याशी संबंधित काही व्यक्तींमध्ये हितसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या टोळी युद्धामुळे भवानी पेठ आणि परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.














