पुणे : महापालिका निवडणुकीत तिकीटाच्या अपेक्षेने पक्षांतरांची लगबग सुरू असतानाच शरद पवार गटाचे पुण्यातील एकमेव आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मतदारसंघात (वडगाव शेरी) पक्षाची निशाणी ‘तुतारी’ गायब होण्याची शक्यता आहे. बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, सून ऐश्वर्या पठारे आणि भाची तृप्ती भरणे हे सर्व भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. आमदार असलेल्या पक्षातून कुटुंबीयांनी भाजपची वाट धरल्याने शरद पवार गटात प्रचंड नाराजी आणि कुजबूज सुरू झाली आहे.
प्रभाग क्रमांक ४ (खराडी-वाघोली) मध्ये सुरेंद्र पठारे यांना भाजपकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. त्याच प्रभागात भाची तृप्ती संतोष भरणे यांनाही भाजपचे तिकीट मिळाले. शेजारच्या प्रभाग क्रमांक ३ (विमाननगर) मधून सून ऐश्वर्या सुरेंद्र पठारे भाजपच्या चिन्हावर रिंगणात उतरल्या आहेत. या तिन्ही उमेदवारांचा प्रभाग आमदार पठारे यांच्या विधानसभा मतदारसंघात येतो.
बापूसाहेब पठारे यांनी यापूर्वीच मुलगा स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे सांगत “मी तुतारीचा प्रचार करेन” असे म्हटले होते. मात्र त्यांच्याच हक्काच्या प्रभागात कुटुंबीय भाजपच्या कमळ चिन्हावर लढत असल्याने “पक्षावर विश्वास नाही का?” असा सवाल पक्षात उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे पठारे हे शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत होते.
पठारे यांचा राजकीय प्रवास पक्षांतराने भरलेला आहे. काँग्रेसमधून राष्ट्रवादीत, २०१९ मध्ये अजित पवार गटातून भाजपमध्ये उडी, नंतर पुन्हा शरद पवार गटात प्रवेश. आता कुटुंबीय भाजपकडे गेल्याने त्यांचे राजकीय वजन कमी झाल्याची चर्चा आहे. पक्षात “नैतिकता देते का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घडामोडींमुळे शरद पवार गटाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. आमदाराच्या प्रभागात पक्षाची निशाणी गायब होण्याची शक्यता असताना भाजपला मात्र मजबुती मिळाली आहे. महापालिका निवडणुकीत हे समीकरण किती प्रभावी ठरते, याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-युवकांचे संघटन अन् पक्षासाठी प्रामाणिक काम, राघवेंद्र मानकरांच्या उमेदवारीची इनसाइड स्टोरी…
-पुणेकर महायुतीलाच आशीर्वाद देणार, गणेश बिडकर यांनी भरला भाजपाकडून पहिला उमेदवारी अर्ज
-महापालिका निवडणुकीने पुण्यात वातावरण तापले, भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; अजितदादांसह काँग्रेसला धक्का
-PMC Election: आंदेकर परिवाराची एंट्री, अजित पवारांची ‘तिरकी चाल’; भाजपचा फॉर्म्युला वापरून उमेदवारी














