पुणे : महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युतीचा खेळखंडोबा झाला आहे. रवींद्र धंगेकर आणि पुणे भाजप नेत्यांमधील जुने वैर पुन्हा उफाळून आले असून युती तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. धंगेकरांना विरोध असल्याने भाजपने त्यांच्या प्रभागात (२३ आणि २४) एकही जागा सोडली नाही. त्यामुळे धंगेकर युती तोडण्यासाठी आग्रही आहेत.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. धंगेकरांनी पत्नी आणि मुलासाठी अजित पवारांकडे उमेदवारी मागितली होती; पण देवेंद्र फडणवीसांनी थेट अजित पवारांना फोन करून ती देऊ नका, असे सांगितल्याने हा प्लॅनही फसला. सकाळपासून धंगेकरांसह शिंदे गटाने युती तुटल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आणि १६५ एबी फॉर्म वाटल्याचे सांगितले.
उदय सामंत पुण्यात आल्यानंतर त्यांनी युती कायम असल्याचे सांगितले. मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा संभ्रम कायम राहण्याची शक्यता आहे. भाजपने शिंदे सेनेला दिलेल्या जागांमध्ये मध्यवर्ती शहरातील एकही जागा नाही, यामुळे शिंदे गटात नाराजी वाढली आहे. धंगेकर आणि शहरातील भाजप नेत्यांमधील वैर सर्वश्रुत आहे. युतीच्या बैठकीतही धंगेकरांना लांब ठेवले जाते. धंगेकरांनी सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची तक्रार शीर्ष नेत्यांकडे केली आहे.
सुरुवातीपासूनच त्यांनी अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची भूमिका मांडली आहे. या घडामोडींमुळे पुणे महापालिकेत भाजप-शिंदे सेना युतीला मोठा तडा बसला आहे. अर्ज माघारीनंतर युतीचा अंतिम चेहरा स्पष्ट होईल. धंगेकरांची नाराजी आणि जागावाटपातील रस्सीखेच युतीच्या भवितव्यावर परिणाम करणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पठारे परिवाराची डबल ढोलकी, लेकाला भाजपमध्ये पाठवलं अन् आमदारांनी मतदारसंघाला ‘तुतारीमुक्त’ केलं
-युवकांचे संघटन अन् पक्षासाठी प्रामाणिक काम, राघवेंद्र मानकरांच्या उमेदवारीची इनसाइड स्टोरी…
-पुणेकर महायुतीलाच आशीर्वाद देणार, गणेश बिडकर यांनी भरला भाजपाकडून पहिला उमेदवारी अर्ज
-महापालिका निवडणुकीने पुण्यात वातावरण तापले, भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; अजितदादांसह काँग्रेसला धक्का














