विरेश आंधळकर | पुणे : पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, हा मुहूर्त देखील हुकला असून निवडणूक आयोगाच्या शंकांचे निरसन सुरू असल्याने एक-दोन दिवस उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग रचना तयार केली जात असताना सत्ताधाऱ्यांकडून हस्तक्षेप झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. यामध्ये विशेषत: भाजप नेत्यांनी आपल्याला अनुकूल तीन सदस्यीय प्रभाग केल्याचा आरोप झाला. परंतु ही प्रभाग रचना नगर विकास खात्याकडे गेल्यानंतर मोठे उलटफेर झाल्याची खात्रीलायक माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.
यंदा प्रथमच राज्य सरकारने नवीन नियमावली आणत महापालिकेने तयार केलेली प्रारूप प्रभाग रचना थेट निवडणूक आयोगाकडे न जाता नगर विकास खात्याकडे घेतली. दोन दिवसांपूर्वी नगर विकास खात्याकडून तपासणी होऊन ही रचना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. मात्र हे होत असताना मंत्रालयाच्या स्तरावर महापालिकेकडून तयार करण्यात आलेले तीन सदस्य असणाऱ्या ३ प्रभागांवर फुली मारण्यात आली आहे. तर शेवटचा कात्रज आणि नवीन गावांचा समावेश असणारा पाच सदस्यांचा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नव्याने करण्यात आलेला पाच सदस्यांचा प्रभाग तब्बल एक लाख वीस हजारांच्यावर मतदारांचा असणार आहे. तीन सदस्य असणारे ३ प्रभागांची रचना बदलण्यात आल्याने बाजूला असणाऱ्या 16 प्रभागांच्या रचनेवर याचा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. नव्याने तयार करण्यात आलेला प्रभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला अनुकूल असा तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पुण्यात प्रभाग रचना होत असताना मित्रपक्षांना बाजूला ठेवणाऱ्या भाजपासाठी ही धोक्याची घंटा आहे.
कधी जाहीर होणार प्रभाग रचना?
प्रभाग रचना जाहीर करणे आणि सूचना मागवण्यासाठी 22 ते 28 ऑगस्टची मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र आता 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी मुंबईत पाचारण केले होते. हे अधिकारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक विभागातच होते. मात्र, दिवसभराचे सादरीकरण केल्यानंतरही अर्ध्याच प्रभागांच्या रचनेवर चर्चा झाली असून, शुक्रवारीही दिवसभर ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याने शनिवारी प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.