सोलापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील विधानपरिषद निवडणुकांचे वातावरण तापू लागले असून, १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राजकारणात सर्वाधिक चर्चा सध्या सोलापूर विधानपरिषद मतदारसंघाची होताना दिसत आहे. कारण येथे प्रश्न फक्त विजयाचा नसून, भाजपकडून उमेदवारीची संधी नेमकी कोणाला मिळणार याचा आहे.
सोलापूरमध्ये भाजपची ताकद पाहता ही जागा पक्षाच्या खात्यात जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता पक्षाचा उमेदवार कोण असणार याबाबत राजकीय चर्चांना जोर आला आहे. प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राजन पाटील, राम सातपुते आणि दिलीप माने या नेत्यांची नावे चर्चेत असताना, एका तरुण चेहऱ्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे युवा नेते रोहन सुभाष देशमुख यांचे नाव सध्या राजकीय वर्तुळात वेगाने पुढे येताना दिसत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील विधानपरिषद निवडणूक पूर्णपणे आकड्यांचा खेळ मानली जाते. सोलापूर महापालिकेतील १०२ नगरसेवक, जिल्हा परिषदेत ६८ सदस्य, ११ पंचायत समिती सभापती तसेच विविध नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील ३७४ सदस्य आणि १२ नगराध्यक्ष अशी मोठी मतांची ताकद या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. या सर्व स्थानिक प्रतिनिधींमध्ये भाजपकडे ३५० पेक्षा अधिक मतांचे मजबूत संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपाचा विजय निश्चित मानला जात असला, तरी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान अंतर्गत गटबाजी सांभाळण्याचे असल्याचे मानले जात आहे. सोलापूर भाजपमध्ये ज्येष्ठ नेत्यांमध्ये मोठी राजकीय स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत एखाद्या ज्येष्ठ नेत्याला उमेदवारी दिल्यास इतरांची नाराजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी पक्ष एखादा सर्वमान्य आणि तुलनेने ‘न्यूट्रल’ चेहरा पुढे करू शकतो, अशी चर्चा रंगली आहे.
याच पार्श्वभूमीवर रोहन देशमुख यांच्या नावाची चर्चा अधिक वाढताना दिसत आहे. लोकमंगल समूहाच्या सहकार नेटवर्कमुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मंगळवेढा परिसरातील अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचे थेट संबंध असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय, तरुण नेतृत्व म्हणून विविध गटांमध्ये त्यांची स्वीकारार्हता असल्याने अंतर्गत नाराजी रोखण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एकंदरीत पाहता, कागदावर जरी ज्येष्ठ नेत्यांची नावे आघाडीवर दिसत असली, तरी अंतर्गत राजकीय गणिते, सहकार क्षेत्रातील प्रभाव आणि सर्व गटांना एकत्र ठेवण्याची क्षमता या गोष्टी अंतिम निर्णयात महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे भाजप हायकमांड जुन्या अनुभवी चेहऱ्यांवर विश्वास दाखवणार की एखाद्या तरुण आणि सर्वसमावेशक नेतृत्वाला संधी देणार, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पालिकेत नीट पेपरफुटीवरून विरोधकांचा जोरदार राडा, सभागृहात घोषणाबाजी अन् गोंधळ
-संतापजनक! ‘मुलगा होत नाही’ म्हणून पत्नीच्या गुप्तांगावर ओतलं ॲसिड अन् १५ दिवस ठेवलं डांबून
-“नराधमांना आता खैर नाही!” प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचा एल्गार














