पुणे : पुण्यातील येवलेवाडी परिसरात एका चिमुकलीवर तिच्याच नात्यातील आजोबांनी केलेल्या अमानुष अत्याचारामुळे शहर सुन्न झाले आहे. या भीषण घटनेच्या निषेधार्थ आणि शहरातील महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी शिवसेना पुणे शहराच्या वतीने खडीमशीन चौक, कोंढवा येथे ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला आघाडी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला.
“नराधमांना फाशी झालीच पाहिजे” आणि “पुण्यातील मुलींवरील अत्याचार थांबलेच पाहिजेत” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पुणेकरांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोर्चादरम्यान शिवसैनिकांनी येवलेवाडी पोलीस उपायुक्त कार्यालयावर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. प्रमोद नाना भानगिरे यांनी इशारा दिला की, जर चिमुकल्या मुली स्वतःच्या घरातही सुरक्षित नसतील, तर हे समाजाच्या नैतिक अधःपतनाचे लक्षण आहे. पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल करून थांबू नये, तर ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळवून द्यावी.

तसेच, संवेदनशील भागात वाढीव पोलीस गस्त आणि शाळा परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेत पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचे सांगितले असले तरी, नराधमांना फाशी मिळेपर्यंत शिवसेनेचा हा लढा सुरूच राहील, असा निर्धार शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या-
-NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाइंड’ गजाआड! पुण्याच्या वरिष्ठ शिक्षिकेला दिल्लीतून अटक
-महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यरात्री मोठी खळबळ! पार्थ पवार अचानक ‘वर्षा’वर; फडणवीसांसोबत खलबतं
-पंतप्रधानांचे नाव विचारले अन् बोलतीच बंद! बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांच्या कारवाईचा धडाका
-सूर, ताल आणि कौतुकाचा वर्षाव! ‘पुणे आयडॉल २०२६’चा महाअंतिम सोहळा दिमाखात संपन्न














