पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी भाजपमध्ये धक्कादायक घडामोडी पहायला मिळत आहेत. बाहेरून मोठ्या प्रमाणात उमेदवार आयात केल्याने पक्षाशी गेली अनेक वर्षे एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. एकीकडे बाहेरून आलेल्यांना लाल गालिचा, तर दुसरीकडे पक्षासाठी आयुष्य घालवलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय अशीच परिस्थिती सध्या भाजपमध्ये पाहायला मिळत आहे.
प्रभाग क्रमांक 26 गुरुवार पेठ – घोरपडे पेठ – समता भूमी भागातून तर राजकीय खेळींचा कळस पाहायला मिळाला. भाजपकडून अधिकृत एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सुजाता राजेंद्र काकडे यांच्या उमेदवारीला ऐनवेळी कात्री लावण्यात आली. विशेष म्हणजे, सुजाता काकडे या मतदारसंघातील भाजपचे समन्वयक राजेंद्र काकडे यांच्या पत्नी असून, काकडे कुटुंब गेली पाच दशके भाजपशी एकनिष्ठ आहेत.
मुंबईहून सूत्रे हलली, कार्यकर्त्यांचा बळी
पक्षातीलच माजी नगरसेवक राहिलेल्या सम्राट थोरात यांच्या पत्नींसाठी मुंबईवरून शेवटच्या क्षणी सूत्रे हलवली गेली आणि त्याचा थेट फटका पक्षाशी प्रामाणिक राहिलेल्या कार्यकर्त्यांना बसला. ज्यांनी पक्षासाठी संघर्ष केला, पक्ष वाढवला त्यांचाच बळी देण्यात आला, असा संतप्त आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत भाजप समन्वयक राजेंद्र काकडे म्हणाले, “जर आम्हाला उमेदवारी द्यायचीच नव्हती, तर आधीच सांगायला हवे होते. अधिकृत एबी फॉर्म देऊन, अर्ज दाखल करून घेतल्यानंतर ऐनवेळी पत्ता कापणे म्हणजे पक्षाशी एकनिष्ठ राहून अहोरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सरळसरळ अपमान आहे. या अन्यायानंतर कार्यकर्ते आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. पक्षाच्या ही निवडणूक अपक्ष लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बिडकरांमुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास, भाजपला वाढता पाठिंबा; मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
-‘निष्ठा उमेदवारीशी नाही, संघटनेशी असते’ लहू बालवडकरांचा ठाम संदेश
-आबा बागुल मैदानात उतरले आणि प्रभाग ३६ची लढत बनली ‘हाय व्होल्टेज’! ग्राउंड पॉलिटिक्स काय सांगतेय?














