बारामती : निवडणुकीला अवघे चार महिने शिल्लक असताना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद बळवंत कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची मुदत ३ एप्रिल रोजी संपली होती. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार त्यांनी कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्याकडे राजीनामा सादर केला.
मिलिंद कांबळे हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीमुळे मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथमच उपाध्यक्ष पदावर नियुक्त झाले होते. त्यांनी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्याचे राजीनामा देताना सांगितले. आता नव्या उपाध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक चार महिन्यांत होणार असल्याने या पदासाठी अनेक इच्छुक सक्रिय झाले आहेत. पुरंदर तालुक्यातील मोठ्या मतदारसंघाचा विचार करता मिलिंद कांबळे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, नेहमी उपेक्षित राहिलेल्या खंडाळा आणि बारामती जिराईत भागालाही संधी मिळण्याची चर्चा आहे.
सामाजिक आणि प्रादेशिक समीकरणे लक्षात घेऊन नव्या उपाध्यक्षाची निवड होणार असल्याचे सांगितले जात आहे. मिलिंद कांबळे यांच्या राजीनाम्यामुळे कारखान्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘राजभवन रोड’ विस्तारीकरणाला गती! औंध-पाषाणमधील वाहतूक कोंडी लवकरच कमी होणार














