पुणे : पुणे शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाचा प्रश्न सध्या चांगलाच तापताना दिसत आला आहे. जवळपास साडेसोळा एकरावर असणाऱ्या इमारतींचा पुनर्विकास एकल पद्धतीने करायचा की एकात्मिकपणे? यावरुन स्थानिक रहिवाशांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. स्थानिक रहिवाशांच्या नोंदणीकृत लोकमान्य नगर रहिवासी संघाचा गेली अनेक वर्षांपासून एकात्मिक विकासासाठी (क्लस्टर डेव्हलपमेंट) आग्रह आहे. रहिवासी संघाच्या सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील निवेदन देत हा प्रश्न जलदगतीने सोडवण्यासाठी निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात एकसंध असणारी कॉलनी तुकड्यांमध्ये विभागली गेल्यास नागरिकांना पायाभूत सुविधांच्या गंभीर अडचणींना सामोरे जावे लागेल. पुढील शंभर वर्षांचा विचार करून सुसज्ज एकात्मिक पुनर्विकास झाल्यास लोकमान्य नगर महाराष्ट्रातील आदर्श म्हाडा कॉलनी ठरेल, असं सांगण्यात आलं आहे.
मुंबईत म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
लोकमान्य नगर रहिवासी संघाच्या माध्यमातून मुंबईमध्ये म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांची भेट घेत एकात्मिक पुनर्विकासाच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघाचे अध्यक्ष विनय देशमुख, सुनील शहा, विनायक देवळणकर, विजय चव्हाण, प्रशांत मोहोळकर आदी उपस्थित होते.
लोकमान्य नगरमधील सर्व इमारती लोड बेअरिंगच्या असून जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, गाड्यांच्या पार्किंगची समस्या निर्माण होत असल्याने क्लस्टर डेव्हलपमेंट सुरक्षित आणि आधुनिक पुनर्विकासाचा सर्वोत्तम पर्याय आहे. म्हाडाने विकसकांची आर्थिक क्षमता देखील तपासावी, ज्यामुळे पुढे अडचणी येणार नाहीत, याबद्दल ठाम मत असून बहुसंख्य रहिवासी एकत्रित पुनर्विकास योजनेच्या बाजूने असल्याची भूमिका, यावेळी रहिवासी संघाच्या वतीने मांडण्यात आली आहे.
शासनाच्या नवीन धोरणानुसार लोकमान्य नगर परिसराचा एकात्मिक विकास करण्यास काही मोजक्या व्यक्तींनी विरोध दर्शविला आहे. परंतु बहुसंख्य रहिवासी ही योजना स्वीकारण्यास तयार असून रहिवासी संघाचे राज्य सरकार व म्हाडाला सहकार्य असल्याचं अध्यक्ष विनय देशमुख म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-एक फोन अन् फडणवीस मदतीला धावले! जगदीश मुळीकांची ‘देवाभाऊं’बद्दल भावनिक पोस्ट
-मोदी सरकारचं पुणेकरांना मोठं गिफ्ट; पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्या हजार ई-बस मंजूर
-PMC Election: भावी नगरसेवकांनो तयारीला लागा! आरक्षण झाले जाहीर; वाचा संपूर्ण यादी एका क्लीकवर
-‘शाहू वसाहती’चा आता स्वयंपुनर्विकास होणार! उपमुख्यमंत्री शिंदेकडून’ एसआरए’ला स्थगिती














