पुणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. राज्यातील ३२ जिल्हा परिषद व त्यांतर्गत ३३६ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सोडत काढण्यात येणार आहे. दुसरीकडे सर्वांचे लक्ष लागलेल्या पुणे महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्यास देखील मुहूर्त मिळाला आहे.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी करण्यात आलेल्या अंतिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे. ही अंतिम प्रभाग रचना सोमवारपर्यंत गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी शहरात बहु-सदस्यीय प्रभागांची संख्या ४१ राहणार असून एकूण सदस्यसंख्या १६५ असणार आहे.
पुणे महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली होती. तर प्रभागाची नावे बदलणे, नैसर्गिक हद्दीबाबत नागरिकांच्या एकूण ५८४३ हरकती आणि सूचना आल्या होत्या. ११ आणि १२ सप्टेंबर यावर सुनावणी देखील पार पडली.
दरम्यान, आता राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिली आहे. प्राधिकृत अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार ही मान्यता मिळाली असून अंतिम प्रभाग रचना सोमवारपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे.














