पुणे : महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रमुख पक्षांनी उमेदवारी देऊन खळबळ माजवली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आंदेकर टोळीतील सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि बंडू आंदेकर यांना तिकीट दिले आहे. या तिघांवर आयुष्य कोमकर हत्येचा आरोप असून ते सध्या तुरुंगात आहेत. ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई झालेल्या या कुटुंबाला तिकीट देण्याने पक्षाच्या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे.
भाजपनेही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या पत्नींना संधी दिली आहे. कुख्यात गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे, रोहिदास चोरघे यांची पत्नी प्रतिभा चोरघे यांना तिकीट मिळाले. रोहिदास चोरघेवर हत्या, अपहरण, पोलिसांवर हल्ला आणि गोळीबाराचे गंभीर गुन्हे आहेत. संदीप बांदल हत्येप्रकरणातही त्याचे नाव आहे. या निर्णयांमुळे शहरात गुन्हेगारीचा राजकारणात वाढता हस्तक्षेप अधोरेखित झाला आहे.
शहरात वाढत्या गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असताना असे उमेदवार मैदानात उतरल्याने युवा पिढीला गुन्हेगारीकडे जाण्यापासून रोखणे मोठे आव्हान ठरले आहे. गुन्हेगारांच्या कुटुंबीयांना तिकीट देण्याने समाजात चुकीचा संदेश जात असल्याची टीका होत आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, प्रचारात पैशांचा गैरवापर, अवैध व्यवहार किंवा दहशत निर्माण करणाऱ्यांवर उमेदवार असले तरी कठोर कारवाई होईल.
सोशल मीडियावरील द्वेषमूलक पोस्ट्स, धमकी आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या मजकुरावर तात्काळ कारवाई केली जाईल. ही निवडणूक शहराच्या कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या प्रचारावर पोलिसांची करडी नजर आहे. या निर्णयांचा निवडणुकीवर आणि शहराच्या भविष्यावर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-प्रभाग २५ मध्ये प्राचाराचा झंजावात, बाप्पु मानकरांना नागरिकांचा वाढता पाठिंबा, घरोघरी संपर्क दौरा
-प्रभाग 24 मध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजप प्रवेश, बिडकरांना वाढता पाठिंबा तर भाजपला बळ
-बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन प्रभाग 8च्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ
-राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्यासह भाजप उमेदवारांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद














