पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबरला असून संपूर्ण देशातील भाजपकडून यासाठी जंगी तयारी केल्याचं पहायला मिळत आहे. मोंदींच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दि. १६ रोजी पुण्यात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा ड्रोन शोसह दिव्यांग सहाय्यता शिबीर आणि संगीत रजनीचे आयोजन स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर केले आहे. ‘ज्योतीने तेजाची आरती’ या ड्रोन शोव्दारे पुणेकरांच्या वतीने पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात हा ड्रोन शो प्रथमच होणार असून यातून विकसित भारताच्या संकल्पाचे दर्शन पुणेकरांना घडणार आहे. केंद्रीय मंत्री मोहोळांच्या वतीने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून थ्रीडी स्वरूपात असलेला हा ड्रोन शो असणार आहे. या ड्रोन शोमध्ये मोदी सरकारच्या कामगिरीसह पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मानबिंदूंचे दर्शनही पुणेकरांना घडेल. तसेच पंतप्रधान मोदींनी केलेल्या विकसित भारताचा संकल्पही याद्वारेल पुणेकरांना अनुभवता येईल. हजारो ड्रोन्स जेव्हा अवकाशात झेपावतील, तेव्हा पुण्याच्या ३-४ किलोमीटर परिसरापर्यंतच्या भागातील नागरिकांना हा शो अवकाशात पाहता येणार आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला हजारो ड्रोन पुण्याच्या अवकाशात झेपावतील आणि त्यांच्या विविध फॉर्मेशन्समधून विकसित भारताच्या दिशेने झालेल्या प्रवासाचे नयनरम्य दर्शन पुणेकरांना घडेल, असं मोहोळ म्हणाले आहेत.
केंद्रीय मंत्री मोहोळ पुढे म्हणाले, ‘या निमित्ताने मंगळवार दि. १६ सप्टेंबर या दिवशी स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत दिव्यांगांसाठी सहाय्यता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात १२०० हून अधिक दिव्यांगांना १७५० आवश्यक साहित्यांचे मोफत वितरण या शिबिरात करण्यात येणार आहे. शिबिरानंतर याच ठिकाणी सायंकाळी ५ ते १० ख्यातनाम संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांची लाईव्ह कॉन्सर्ट होईल. दरम्यान रात्री ८ वाजता ‘ज्योतीने तेजाची आरती’ हा ऐतिहासिक ड्रोन शो होणार आहे. या सर्व कार्यक्रमात आपण सहभागी होत या सर्व क्षणांचे साक्षीदार होऊन आपल्या लाडक्या पंतप्रधानांना शुभेच्छा देऊ या’.
‘२६ मे २०१४ या दिवशी संसदेच्या पायरीवर नतमस्तक झालेल्या मोदींचे दृष्य आजही भारतीयांच्या मनावर कोरलेले आहे. त्यांनी गेल्या अकरा वर्षात १४० कोटी देशवासीयांना ‘राष्ट्रहित सर्वतोपरी’ हा मंत्र देत देशात आणि देशाबाहेर ताठमानेने उभे रहाण्याचे बळ दिले. ‘मै देश को झुकने नहिं दुंगा’ हा वज्रनिर्धार करत विकसित भारताचा संकल्प करुन देशवासीयांसाठी ते प्रेरणास्रोत झाले आहेत. सर्वसामान्य देशवासीयांचे जीवनमान उंचाविण्यापासून ते मंगळापर्यंत झेप घेणारे नवे अवकाश धोरण राबविणारे, कोरोनाची लस मोफत देऊन आफ्रिकेसह १४० लहान, गरीब देशांतील नागरीकांच्या जीवनाचे रक्षण करण्यापासून ते पाकिस्तानच्या घरात घुसून त्यांची नांगी ठेचणे, हे मोदींचे कर्तृत्व आहे. भारतवर्षाचा उर्जा स्त्रोत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून हजारो ड्रोन्सच्या माध्यमातून मोदींना पुणेकरांच्या वतीने शुभेच्छा देणारा, डोळ्यांचे पारणे फेडणारा अनोखा कार्यक्रम सादर होतो आहे. या दिवशी आपण सर्व पुणेकर त्यांना शुभेच्छा देऊ या’ असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.














