पुणे : महाराष्ट्रातील आपत्कालीन आरोग्य सेवेतील महत्त्वाची कडी असलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यभरातील ५,४६,०१० अपघातग्रस्तांना वेळेवर वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे. या सेवेने अत्यंत तातडीच्या परिस्थितीत रुग्णांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून उपचार देत सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवा भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मदतीने सेवा दिली जात आहे. या सेवेचा उद्देश नागरिकांना उच्च दर्जाची, तत्काळ आणि सुरक्षित वैद्यकीय मदत प्रदान करणे आहे.
विशेषत: आदिवासी जिल्ह्यांमध्येही या सेवेचा मोठा प्रभाव दिसून आला आहे. नंदुरबार, गडचिरोली, धुळे, पालघर, नाशिक, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये १,२१,६८५ अपघातग्रस्तांना मदतीचा हात मिळाला आहे. दुर्गम भागांमध्येही ही सेवा कार्यरत असून, रुग्णांपर्यंत तातडीने मदत पोहोचवली जात आहे.
राज्यातील समृद्धी महामार्गावरही १०८ रुग्णवाहिका सेवेनं आपली तत्परता दाखवली आहे. या महामार्गावर २४ तास कार्यरत असलेल्या २१ आपत्कालीन पथकांनी आतापर्यंत ५८९ अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदत पुरवली आहे. महामार्गावर असलेल्या धोकादायक जागांवर ही सेवा अधिक प्रभावी ठरली आहे.
बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड म्हणाले की, “महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने आमच्यावर सोपवलेली जबाबदारी आम्ही यशस्वीपणे पार पाडत आहोत. समाजातील प्रत्येक नागरिकाला तत्काळ आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणे हे आमचे ध्येय आहे.” ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारतीय सैन्यदलासोबत समन्वय साधत १०८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे, आणि लवकरच या ‘वीर योद्ध्यांना’ सन्मानित केले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातून कोणाला मिळणार विधान परिषदेवर संधी, जोरदार फील्डिंग लागली; मुख्यमंत्र्यांचा कौल कोणाला?
-ना अधिकृत टेंडर, ना करारनामा; PMC जलतरण तलावांचा कारभार रामभरोसे, पुणेकरांची सुरक्षा धोक्यात!














