पुणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील दोन महिला उमेदवारांमधील रविवारी रात्रीच्या बैठकीत जोरदार वाद झाला. हा वाद इतका तीव्र झाला की, दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. अखेर प्रकरण खडक पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले, पण निवडणुकीपूर्वी बदनामी टाळण्यासाठी तक्रार दाखल न करता वरिष्ठांकडे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रचार संपल्यानंतर झालेल्या बैठकीत एका महिला उमेदवाराच्या भावाने दुसऱ्या महिला नगरसेविकेवर “मागील निवडणुकीत दगा फटका केला, यावेळी करू नका,” असा खोचक आरोप केला. क्रॉस व्होटिंग आणि पॅनेलमध्ये राहून एकमेकांविरोधात मतदान न करण्यावर चर्चा सुरू असतानाच मागील अनुभवाचा विषय निघाला आणि वाद विकोपाला गेला.
रात्री उशिरापर्यंत वाद मिटण्याची चिन्हे नव्हती. दोन्ही उमेदवारांनी पोलीस स्टेशन गाठले आणि एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नेत्यांनी समजूत काढून प्रकरण थांबवले. सोमवारी हा वाद वरिष्ठ नेत्यांकडे मांडला जाणार आहे. या वादानंतर पॅनेलमधील इतर उमेदवारांनी संबंधित महिला उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला. एकत्रित प्रचारासाठी उघडलेल्या कचेरीवरील तिचा पोस्टर झाकण्यात आला आहे.
चार उमेदवारांच्या पॅनेलमध्ये फूट पडल्याने पक्षाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा अंतर्गत कलह मोठी डोकेदुखी ठरत आहे. प्रभाग २२ मधील हा वाद पक्षाच्या प्रतिमेला धक्का देणारा ठरला आहे. आता वरिष्ठ नेते कसा तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये भाजपसाठी अनुकूल वातावरण, अमोल बालवडकरांसमोर कठीण आव्हान
-‘दादा हाच का तुमचा वादा?’ म्हणत सुस, बाणेरकरांनी दाखवला अजित पवारांना आरसा
-ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजन सोहळ्याने निवडणूक कचेरीचे अनोखे उद्घाटन
-‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’चा बिडकर पॅटर्न! हजारो नागरिकांच्या समस्या मार्गी














