पुणे : शनिपार चौकातील फूटपाथवर भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या चरण नामदेव वनवे यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल १ लाख १३ हजार ७४० रुपयाचे दान दिले. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्यासमवेत वनवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीचा धनादेश आज सुपूर्त केला आहे. अशा कठीण परिस्थितीत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कसबा मतदारसंघातील भाजी विक्रेते चरण वणवे यांनी दाखवलेलं माणुसकीचं उदाहरण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
वनवे हे शंकर महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या घरातील महाराजांच्या पादुकांसमोर त्यांनी एक डबा ठेवलेला आहे. भाजी विक्रीतून आलेल्या रकमेमधून दररोज १०० रुपये ते या डब्यामध्ये टाकून ठेवतात. आपदग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशानेच ही बचत केली जाते. ती आज मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आली.
वनवे म्हणाले, “आमची तिसरी पिढी भाजी विक्रीचा व्यवसाय करते. माझ्या आईने कोरोनाच्या काळात गरजवंतांना एक लाख रुपयांची मदत केली होती. आपल्याकडील पैसा हा इतरांच्या कामाला यावा अन्यथा तो दुःखाचा डोंगर आहे, अशी आईची शिकवण होती. तिच्या पश्चात मी हा वारसा पुढे नेत असून नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने दररोज शंभर रुपये बाजूला ठेवत आलो आहे. आज समाजाची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार मी खारीचा वाटा उचलला आहे.”
आमदार रासने म्हणाले, “अत्यंत गरीब परिस्थितीतही आपण समाजाचे काही देणे लागतो या नात्याने वनवे यांनी केलेली मदत लाख मोलाची आणि समाजाला प्रेरित करणारी आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने कसबा मतदारसंघातील अभियानाचा आम्ही आज यानिमित्ताने शुभारंभ केला. अधिकाधिक नागरिकांनी पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन मी करतो.”
महत्वाच्या बातम्या-
-पोलिसांनी मोक्का लावला पण निल्या घायवळ आधीच पळाला, लंडनमध्ये अलिशान घर
-अजित पवारांच्या लाडक्या आमदाराच्या हत्येचा कट, तपासासाठी ATSची स्थापना
-‘मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या मुलांची…’, शेतकऱ्यानी चिठ्ठी लिहीत संपवलं जीवन
-भाजपसाठी अटीतटीचा सामना, मोहोळांवर दिल्लीचा विश्वास; सोपवली मोठी जबाबदारी
-शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची जागा खासगी विकासकाला? चकोर गांधी यांनी मांडले सत्य














