लोकमान्य नगर म्हाडा सोसायटी म्हणजे पुणे शहराच्या हृदयस्थानी असणारा भाग. ६० वर्षांपूर्वी म्हाडाच्या माध्यमातून वसविण्यात आलेल्या हा वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. याला कारण ठरतेय ते येथील येथील इमारतींचा पुनर्विकास एकल पद्धतीने व्हावा की एकात्मिक? सध्या दोन गटांमध्ये येथील स्थानिक विभागले गेल्याचे चित्र आहे. लोकमान्य नगर रहिवासी संघाच्या माध्यमातून 2021 पासून लोकमान्य नगर चा सुनियोजित विकास होण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटची भूमिका मांडली जात आहे. आज रहिवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकोरे यांची भेट घेत शासनाच्या धोरणानुसार क्लस्टर डेव्हलपमेंटच्या अंमलबजावणीला गती देण्याची मागणी केली आहे.
लोकमान्य नगर पुनर्विकासाच्या प्रश्नावर सध्या राजकीय वातावरण तापले असले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज शासनाकडून एकल विकासावर देण्यात आलेली स्थगिती ठेवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तर दुसरीकडे लोकमान्य नगर रहिवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकोरे यांची भेट घेतली. यावेळी लोकमान्य नगरमधील बहुसंख्य रहिवासी एकात्मिक पुनर्विकासाच्या बाजूने आहेत आणि त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहेत. शासनाने योग्य निर्णय घेत लवकरात लवकर या पुनर्विकासाची अंमलबजावणी सुरू करावी, असे निवेदन देण्यात आले.
यावेळी.बोलताना रहिवासी संघाचे अध्यक्ष विनय देशमुख म्हणाले, “लोकमान्य नगर रहिवासी संघ २०२१ पासून एकात्मिक पुनर्विकासाची मागणी करत आहे. आमच्या परिसरातील बहुसंख्य कुटुंबे या योजनेच्या बाजूने आहेत. इमारती अत्यंत जीर्ण झाल्या असून पायाभूत सुविधा निकृष्ट अवस्थेत आहेत. रस्त्यांची रुंदी, पार्किंग, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण यांसारख्या मूलभूत बाबींचा अभाव आहे. अशा परिस्थितीत क्लस्टर डेव्हलपमेंट हाच परिसराचा सुरक्षित आणि शाश्वत विकास करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.”
रहिवासी संघाचे पदाधिकारी सुनील शहा म्हणाले की, लोकमान्य नगरचा विकास हा केवळ इमारतींच्या बदलाचा विषय नाही, तर परिसराच्या सुरक्षिततेचा, नागरिकांच्या सोयीसुविधांचा आणि जीवनमान उंचावण्याचा आहे. त्यामुळे हा पुनर्विकास राजकारणाचा विषय नसून, नागरिकांच्या भविष्यासाठी आवश्यक आहे.
यावेळी लोकमान्य नगर रहिवाशी संघाचे अध्यक्ष विनय देशमुख, सुनिल शहा, विजय चव्हाण, विनायक देवळणकर, प्रवीण परशुरामी, प्रशांत मोहोळकर तसेच इतर सदस्य उपस्थितीत होते.














