पुणे : कोंढवा पोलिसांनी बोपदेव घाट परिसरातील एका लॉजवर छापा टाकून बांगलादेशी तरुणींना देहविक्रयास प्रवृत्त करणाऱ्या दोघांना अटक केली. लॉज व्यवस्थापक रवी छोटे गौडा (वय ४६, रा. येवलेवाडी) आणि कामगार सचिन प्रकाश काळे (वय ४०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे जाळे असल्याचा संशय आहे.
पोलीस कर्मचारी अमोल हिरवे यांना लॉजमध्ये बांगलादेशी तरुणींना देहविक्रयासाठी प्रवृत्त केले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केल्यानंतर पथकाने छापा टाकला. चौकशीत रवी गौडाने दलालांमार्फत तरुणी आणल्याची कबुली दिली. तरुणींच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांना धमकावले जात होते.
प्रभारी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक कुमार घाडगे यांच्या नेतृत्वात अमोल हिरवे, अरुण कीटे, सुषमा हिंगमिरे, सोनाली कांबळे, राहुल रासगे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. बांगलादेशी दलालांनी किरकोळ पैशांचे आमिष दाखवून तरुणींना भारतात आणले असल्याचे तपासात समोर आले आहे.
पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांची कारवाई सुरू आहे. नुकताच बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत छापा टाकून बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते. न्यायालयाने बेकायदा वास्तव्याप्रकरणी दोन तरुणींना दोन वर्षांची सक्तमजुरी सुनावली असून शिक्षेनंतर त्यांची बांगलादेशात रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण मानवी तस्करीच्या आंतरराष्ट्रीय जाळ्याकडे निर्देश करत आहे. कोंढवा पोलिसांकडून दलाल आणि मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यात येत आहे. पुण्यात अशा प्रकारच्या कारवाया वाढल्याने बेकायदा वास्तव्य आणि देहविक्रयाच्या रॅकेटवर पोलिसांचा वचक बसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘विश्वास विकास निर्विवाद’ माजी सभागृह नेते गणेश बिडकरांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन!
-लहू बालवडकरांचा गाव भेट दौरा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! प्रभाग ९च्या विकासावर संवाद
-७ महिने पुणे विमानतळ परिसरातच लपलेला बिबट्या अखेर जेरबंद
-१०८ रुग्णवाहिकेची राज्यातील १ कोटी १४ लाख नागरिकांना मोफत आरोग्यसेवा














