पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण कमालीचे तापले असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील ‘जिजाई’ निवासस्थानी वेगळेच राजकीय नाट्य पाहायला मिळाले. भाजपकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्यासह इतर नेते अजितदादांच्या भेटीला पोहोचले, मात्र रिकाम्या हाताने त्यांना परतावं लागलं आहे.
भाजपकडून अद्याप अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न करताच संभाव्य उमेदवारांना थेट एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले असून, अनेक इच्छुकांनी आज मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल केले. या गोंधळलेल्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भाजपसोबत महायुती होणार की नाही? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. भाजपने पुण्यात शिवसेनेला केवळ १५ जागांची ऑफर दिल्याने शिवसेनेतील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे.
याच पार्श्वभूमीवर पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर आणि युवा आघाडीचे किरण साळी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिजाई निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे शिवसेना–राष्ट्रवादी युतीचा प्रस्ताव घेऊन ते अजितदादांकडे गेले असल्याच्या चर्चांना उधाण आले.
मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच होते. अजित पवार यांनी या दोन्ही नेत्यांना भेटण्यासाठी वेळ देण्यास स्पष्ट नकार दिला. पूर्वनियोजित बैठका आणि कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचे सांगत अजितदादांनी कोणतीही राजकीय चर्चा टाळल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. बराच वेळ वाट पाहूनही भेट न झाल्याने, रवींद्र धंगेकर हे निराश मनस्थितीत ‘जिजाई’तून बाहेर पडले. यानंतर माध्यमांशी बोलताना धंगेकर यांनी अजित पवार यांना कोणताही युतीचा प्रस्ताव दिला नसल्याचे सांगून चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘प्रस्ताव नव्हताच तर भेटीचा प्रयत्न कशासाठी?’ असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
एका बाजूला भाजपकडून मिळणाऱ्या तोकड्या जागा, तर दुसरीकडे अजित पवारांकडून सकारात्मक प्रतिसादाचा अभाव या दुहेरी कात्रीत एकनाथ शिंदेंची शिवसेना अक्षरशः अडकली आहे. महायुतीतील या तणावाचा फटका शिवसेनेला बसणार की नवा राजकीय डाव आखला जाणार? याकडे आता संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-युवकांचे संघटन अन् पक्षासाठी प्रामाणिक काम, राघवेंद्र मानकरांच्या उमेदवारीची इनसाइड स्टोरी…
-पुणेकर महायुतीलाच आशीर्वाद देणार, गणेश बिडकर यांनी भरला भाजपाकडून पहिला उमेदवारी अर्ज
-महापालिका निवडणुकीने पुण्यात वातावरण तापले, भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; अजितदादांसह काँग्रेसला धक्का
-PMC Election: आंदेकर परिवाराची एंट्री, अजित पवारांची ‘तिरकी चाल’; भाजपचा फॉर्म्युला वापरून उमेदवारी
-पुणे महापालिकेसाठी महायुती फिक्स? मुंबईत फडणवीस–सामंतांची बैठक, गणेश बिडकरांची पोस्ट चर्चेत














