पुणे : पुण्यातील चिन्मय हॉस्पिटलमध्ये चुकीच्या उपचारांमुळे ११ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक प्रकरणात सहकारनगर पोलिसांनी डॉ. मुकुंद संगमनेरकर यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात हॉस्पिटलचे नाव आणि रजिस्ट्रेशन यातही गंभीर अनियमितता समोर आल्या आहेत.
फिर्यादी अॅड. हनुमान गिते यांच्या ११ महिने १८ दिवसांच्या मुलीला उलटीचा त्रास असल्याने चिन्मय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ. श्रीधर जाधव यांनी तपासून अॅडमिट केले. उपचारादरम्यान दोन ५०० मिली सलाईन पूर्ण स्पीडने दिले गेले. मात्र मॉनिटरिंग मशीन चार्ज नसल्याने बंद पडले. रात्री ११:५० वाजता मुलीचा मृत्यू झाला.
मृत्यूनंतर डॉ. मुकुंद संगमनेरकर यांनी इतर डॉक्टर आणि परिचारिकांच्या मदतीने फाईल, औषध रजिस्टर आणि मृत्यू प्रमाणपत्रात फेरफार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झाले. मृत्यूचे कारण आणि वेळ खोटी नमूद करण्यात आली. हॉस्पिटल ‘चिन्मय इन्स्टिट्यूट ऑफ पेडियाट्रिक्स’ या नावाने चालवले जात होते, परंतु महापालिकेत फक्त ‘चिन्मय नर्सिंग होम’ म्हणून नोंद होती.
ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने दिलेल्या अहवालात उपचारात प्रचलित मानकांचा अवलंब न केल्याचे आणि सतत देखरेख नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात डॉ. मुकुंद संगमनेरकर, डॉ. गणेश आरेकर, डॉ. श्रीधर जाधव, डॉ. राधा संगमनेरकर, परिचारिका मनिषा शिंदे आणि सरिता सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आरएमसी कारवाई अचानक रद्द! आमदारांच्या दबावापुढे महापालिका झुकली?
-पुण्यात उष्णतेचा तडाखा! ४२ अंशांवर पोहोचले तापमान, पुढील ४ दिवस सावध राहा
-पुण्यात अनधिकृत होर्डिंगवर चालणार हातोडा, पण किती होर्डिंग अनधिकृत? महापालिकेकडे आकडाच नाही
-शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! ‘हवेली सभापतींचा ‘बळीराजा’ मॉडेल राज्यभर राबविणार’














