पुणे : महापालिका निवडणुकीची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीत काही ठिकाणी मित्रपक्ष सोबत तर काही ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढणार असले तरी पुण्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युती निश्चित झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर जागावाटपाच्या चर्चांना जोर आला. काल दुपारी भाजप-शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली, तर रात्री उशिरा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
शिवसेना शिंदे गटाला पुण्यात ३५ ते ४० जागा हव्या असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर १६५ जागांवर स्वबळाचा आग्रह धरत होते, तर शहरप्रमुख नाना भानगिरे युतीसाठी ३५-४० जागा मागण्यावर ठाम होते. कालच्या बैठकीनंतर धंगेकर आणि भानगिरे यांनी सामंत यांची भेट घेतली. येत्या तीन-चार दिवसांत जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
भाजप नेते मात्र किमान १२५ जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. भाजपकडे सध्या १०५ माजी नगरसेवकांचे बळ आहे. गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार आणि राष्ट्रवादी-काँग्रेसच्या जागा लक्ष्य करून तगडे उमेदवार उतरवले जाणार आहेत. १२५ पेक्षा जास्त जागांवर युतीची वाटाघाटी होणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
काल रात्रीच्या बैठकीला धंगेकर, भानगिरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. उदय सामंत यांच्या उपस्थितीत युतीची रणनीती ठरली. महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यात स्थान नसल्याने भाजप-शिवसेना युतीला अधिक महत्त्व आले आहे. पुणे महापालिकेच्या १६२ जागांसाठी ही युती निर्णायक ठरणार आहे. भाजपच्या १२५ पेक्षा जास्तच्या दाव्यापुढे शिवसेनेच्या ३५-४० जागांच्या मागणीला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पारंपरिक प्रचाराला आधुनिकतेची जोड! बीडकरांची प्रचारात आघाडी; प्रभाग २४ मध्ये फिरू लागले ‘विकासरथ’
-‘मुलाखतीला गेलात तर भविष्यात…’ अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ‘दादागिरी’
-पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीची मैत्रिपुर्ण लढत; फडणवीस-अजितदादांची रणनीती














