पुणे : सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तब्बल १६ महिने पगार थकल्याने कर्मचारी संघटनांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे संस्थेतील शैक्षणिक कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून, विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला त्वरित पगार देण्याची मागणी करत नाहीतर उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, संस्थेतील अनेक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना गेल्या १६ महिन्यांपासून नियमित वेतन मिळालेले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही. आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला असून दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले आहे. अनुभवी शिक्षक नोकरी सोडून जात असल्याने नवीन नेमणुका होत आहेत, पण त्यांनाही वेळेवर वेतन मिळत नाही. या आंदोलनामुळे प्रात्यक्षिके, अंतर्गत परीक्षा, व्याख्याने आणि इतर शैक्षणिक उपक्रमांवर मोठा परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पगाराची रक्कम द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
आंदोलन सुरू असतानाही संस्थेचे प्रशासन गप्प बसले असून, कर्मचाऱ्यांच्या संयमाची परीक्षा होत आहे. दुसरीकडे, सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या वडगाव बुद्रुक येथील ४३ आणि कोंढवा येथील ६ मिळकतीच्या कर थकबाकीमुळे महापालिकेने गेल्या वर्षी कार्यालय सील केले होते. संस्थेच्या शहरातील १२८ मिळकतींचा ३४५.४३ कोटी रुपयांचा मिळकत कर थकला असून, एरंडवणा येथील मुख्य कार्यालय ४७.४३ कोटी थकबाकीमुळे सील करण्यात आले आहे.
संस्था आणि महापालिकेमधील न्यायालयीन वाद सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सिंहगड इन्स्टिट्यूटमधील पगार थकवा आणि मिळकत कर थकबाकी यामुळे संस्थेची आर्थिक स्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट होते. कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा शैक्षणिक वर्षावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सोशल मीडियावरुन ओळख, प्रेम अन्… तरुणीला बसला ९२ हजारांना दणका, नेमकं प्रकरण काय?
-३० जानेवारीला ठरणार महापौर कोण? राज्य शासनाने जाहीर केला निवडीचा कार्यक्रम
-“११०८ मते कमी कशी? प्रशासनाने उत्तर द्यावं”; पुणे महापालिका निकालावर वसंत मोरेंचा आक्षेप














