पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने अजित पवार गटाला धक्के देण्याची मोहीम तीव्र केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे यांना भाजपने थेट ऑफर दिल्याची कबुली सिद्धार्थनेच दिली. “मला भाजपसह इतर पक्षांकडून विचारणा झाली,” असे सिद्धार्थ बनसोडे म्हणाले आहेत. मात्र अजित पवारांनी वडिलांवर विश्वास टाकला असल्याने आपण राष्ट्रवादीतच राहू, असे स्पष्ट करत त्यांनी ऑफर नाकारली.
अण्णा बनसोडे यांनी मात्र “मुलाला अशी कोणतीही विचारणा झाली नाही,” असे सांगून अनभिज्ञता दाखवली. पुण्यात शरद पवार गटाच्या आमदार बापू पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे भाजपमध्ये गेल्यानंतर आता अण्णा बनसोडेंच्या मुलाला फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे सिद्धार्थच्या वक्तव्याने स्पष्ट झाले. या प्रकरणावर अजित पवार किंवा भाजप नेत्यांकडून अधिकृत भाष्य आलेले नाही.
दुसरीकडे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती निश्चित झाली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने हा निर्णय झाला. पुढच्या काही तासांत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषणा होईल. शिवसेनेने ३० जागांची मागणी केली असली तरी तडजोड होईल आणि रस्सीखेच होणार नाही.
बारणे यांनी स्पष्ट केले की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जास्त जागांची ऑफर दिली तरी ती स्वीकारली जाणार नाही. भाजपसोबतची पारंपरिक युती कायम ठेवण्याचा अंतिम निर्णय झाला आहे. या युतीमुळे पिंपरी महापालिकेच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत’, जमीन घोटाळ्या प्रकरणी विजय कुंभार-अंजली दमानियांचा दावा!
-पुण्यात अजितदादांची ‘पॉवर’, भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला मोठा झटका
-रायफल शूटिंगमध्ये अप्रतिम आशिष ढेंगे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
-‘आज २२ जणांचा प्रवेश झाला, पुढेही धक्कातंत्र चालू राहील’, महेश लांडगेंचा रोख नेमका कोणाकडे?














