पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला सलग दोन धक्के बसले आहेत. प्रभाग क्रमांक १० (शाहूनगर-संबाजीनगर) मधून पक्षाच्या अधिकृत उमेदवार वर्षा भालेराव यांनी माघार घेतल्याने भाजपच्या सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. त्याआधी प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपचे रवी लांडगे बिनविरोध निवडून आले होते.
प्रभाग १० मधील मागास प्रवर्ग महिलांसाठीच्या ‘ब’ जागेवर सुप्रिया चांदगुडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीने वर्षा भालेराव यांना उमेदवारी दिली होती. भालेराव यांनी अर्जही दाखल केला होता; मात्र माघारीच्या मुदतीत त्यांनी अर्ज मागे घेतला. मनसेच्या गीता चव्हाण, अपक्ष रेणुका भोजने आणि रोहिणी रासकर यांनीही माघार घेतल्याने सुप्रिया चांदगुडे बिनविरोध निवडून आल्या.
सुप्रिया चांदगुडे या उद्योजक उमेश चांदगुडे यांच्या भावजय आहेत. २०१७ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता; मात्र यावेळी बिनविरोध विजय मिळाला. या प्रभागात शाहूनगर, संभाजीनगर, एचडीएफसी कॉलनी, इंदिरानगर, दत्तनगर, विद्यानगर, लालटोपीनगर, अमृतेश्वर कॉलनी, म्हाडा कॉलनी, मोरवाडी यांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक ६ (सद्गुरूनगर, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, भगतवस्ती) मधून भाजपचे रवी लांडगे यांना राष्ट्रवादीकडून विरोधच नव्हता. राष्ट्रवादीच्या निलेश सुर्यवंशी यांनी मनसेकडून अर्ज दाखल केला होता. मात्र जात प्रमाणपत्रामुळे अर्ज अपात्र ठरला. त्यामुळे लांडगे गुरुवारीच बिनविरोध निवडून आले. २०१७ मध्येसुद्धा ते बिनविरोध निवडून आले होते.
या दोन बिनविरोध विजयांमुळे भाजपला निवडणुकीपूर्वीच दोन नगरसेवक मिळाले आहेत. राष्ट्रवादीला मात्र उमेदवारांच्या माघारीमुळे मोठा फटका बसला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची ताकद वाढत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपच्या तिकिटावर कोट्यवधींच्या मालमत्तेचे उमेदवार; पठारे कुटुंब सर्वात श्रीमंत
-भाजपच्या बंडखोरांना ‘दादांची’ साथ, भाजपकडून बंडोबांच्या बंदोबस्ताला सुरुवात
-प्रभाग ३६ मध्ये धनुष्यबाणाची हवा; आबा बागुलांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद!
-ना आलिशान कार ना महागडी दुचाकी, नावावर फक्त रुग्णवाहिका असलेला ‘माणूसकीने श्रीमंत’ उमेदवार
-तोंडचा घास हिसकावला! प्रभाग २६ मध्ये भाजपकडून उमेदवारीचा खेळ, एबी फॉर्म देऊन काकडेंचा पत्ता केला कट














