पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपाने गोपनीय ‘मेरिट सर्व्हे’ केल्याने पक्षात खळबळ माजली आहे. अनेक माजी नगरसेवक, निष्क्रिय दिग्गज आणि जुन्या कार्यकर्त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. प्रदेश स्तरावरून त्रयस्थ एजन्सीकडून हा सर्व्हे करून अहवाल थेट पक्षश्रेष्ठींकडे पाठवला असल्याने स्थानिक नेत्यांनाही त्याची पूर्ण कल्पना नाही.
प्रभाग रचना ठरण्यापूर्वी पहिला, अंतिम रचना झाल्यानंतर दुसरा आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर तिसरा असे तीन सर्व्हे पूर्ण झाले. आता चौथा व अंतिम सर्व्हे सुरू असून इच्छुक उमेदवारांना ‘चेकलिस्ट’ भरायला सांगितली जाणार आहे. कोणत्या नेत्याचा समर्थक आहे यापेक्षा विजयाची क्षमता किती, हा मुख्य निकष असेल. चेकलिस्टबाबत कमालीची गुप्तता ठेवली असून स्थानिक आमदार-नेत्यांनाही त्याचा तपशील माहीत नाही.
‘जुने विरुद्ध नवे’ हा संघर्ष आता उघड झाला आहे. नव्याने पक्षात आलेले इच्छुक तिकीटासाठी जोर लावत आहेत, तर जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढतो आहे. शहरातील आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे यांना आपल्या समर्थकांना तिकीट मिळवून देण्यासाठी दिल्ली-मुंबईला वारंवार पायघड्या घालाव्या लागणार आहेत.
गेल्या निवडणुकीत भाजपचे ७७ नगरसेवक होते. विधानसभा यशानंतर आत्मविश्वास वाढल्याने पक्षाने ‘१०० पार’चे लक्ष्य आता ‘११० पार’ केले आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांचे भविष्य उज्ज्वल दिसते, पण जुन्या दिग्गजांसमोर अनिश्चितता आहे. मेरिट सर्व्हेने अंतर्गत धुके निर्माण केले असून येत्या काही दिवसांत उमेदवारीवरून मोठे वाद उफाळण्याची शक्यता आहे. एकूणच ही निवडणूक भाजपच्या बाह्य लढाईपेक्षा अंतर्गत स्पर्धेची ठरण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. मेरिट सर्व्हेचा अंतिम अहवाल आणि चेकलिस्टचे निकाल येताच पक्षात खरे चित्र समोर येईल.
महत्वाच्या बातम्या-
-जिल्हा परिषदेची निवडणुक कधी? इच्छुकांनो तयारीला लागा, समोर आली मोठी अपडेट
-स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लांबणार? सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला कडक इशारा
-प्रभाग २७ ची गणितं बदलणार? हेमंत बागुलांच्या संभाव्य उमेदवारीने चर्चेला उधाण!
-राजकारणात मोठी खळबळ; शिवसेनेच्या दोन्ही गटाची युती
-नवले पूल अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना; केंद्रीय मंत्री मोहोळांच्या बैठकीत जबाबदारी निश्चित














