पुणे : राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत मित्र पक्ष म्हणून एकत्र असले तरी भोरमध्ये या दोन पक्षांतील राजकीय वाद उघडपणे समोर येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला संघर्ष आता छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलाच्या उद्घाटनावरून अधिक तीव्र झाला आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार संग्राम थोपटे आमने-सामने आले आहेत.
सदर व्यापारी संकुलाचे काम संग्राम थोपटे यांच्या आमदारकीच्या काळात सुरू झाले होते, तर शंकर मांडेकर यांच्या कार्यकाळात ते पूर्णत्वास गेले. त्यामुळे या कामाचे श्रेय कोणाला, यावरून वाद निर्माण झाला आहे. मांडेकर यांनी निधी देऊन काम पूर्ण केल्याचा दावा करत उद्घाटनाचे आयोजन केले होते; मात्र त्याआधीच थोपटे यांनी या वास्तूचे उद्घाटन केल्याने वाद अधिक चिघळला.
यानंतर दोन्ही गटांतील आरोप-प्रत्यारोप वाढले असून वातावरण तापले आहे. भाजपकडून उद्घाटन पार पडल्यावर मांडेकर यांच्या हस्ते पुन्हा उद्घाटन करण्यात आले. यावेळी मांडेकर यांनी, “अनेक वर्षे सत्तेत राहूनही काहीच विकास झाला नाही. आम्ही निधी देऊन रखडलेले काम पूर्ण केले,” असे सांगत विरोधकांवर टीका केली.
तसेच, नावाच्या फलकावरूनही काही जणांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत मांडेकर यांनी कडक इशारा दिला. “आम्ही शांत आहोत, पण दादागिरी सहन केली जाणार नाही. कोणीही मस्ती दाखवली तर योग्य प्रत्युत्तर दिले जाईल,” असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला.
भोरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचा उल्लेख करत मांडेकर यांनी पुढील चार वर्षांत भोरचा चेहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त केला. विकासकामांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत, अवैध धंद्यांना समर्थन देणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या-
-हौशी गायकांसाठी ‘पुणे आयडॉल २०२६’; सोमेश्वर फाउंडेशनचा उपक्रम, नवोदितांना मोठे व्यासपीठ
-पुण्यात पाणीकपात होणार का? आयुक्तांनी दिली स्पष्ट भूमिका
-पुण्यातून कोणाला मिळणार विधान परिषदेवर संधी, जोरदार फील्डिंग लागली; मुख्यमंत्र्यांचा कौल कोणाला?














