पुणे : स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसमोर आली आहे. म्हाडा पुणे विभागाने ताथवडे येथील गृहप्रकल्पातील ७९२ सदनिकांसाठी लॉटरी काढण्याची घोषणा केली आहे. ही लॉटरी ८ जुलै २०२६ रोजी होणार असून, आज सोमवार २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १.३० वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू झाली आहे.
या प्रकल्पाला मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या अत्यंत जवळीक असल्याने कनेक्टिव्हिटीचा मोठा फायदा आहे. हिंजवडी आयटी हब आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्राजवळ असल्याने या घरांना चांगली मागणी आहे. हा प्रकल्पाचा अंतिम टप्पा आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यातील ६०० हून अधिक घरांची विक्री यशस्वीरित्या झाली आहे.
या लॉटरीमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) २४ सदनिका आणि मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) ७६८ सदनिका उपलब्ध आहेत. LIG सदनिकांचे क्षेत्रफळ ५९ ते ६० चौ. मीटर असून किंमत ४६ ते ४७ लाख रुपये आहे. MIG सदनिकांचे क्षेत्रफळ ६९ ते ७० चौ. मीटर असून किंमत ६४.५० ते ६५.५० लाख रुपये आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २ जून २०२६ आहे. ३० जून रोजी पात्र अर्जांची यादी जाहीर होईल आणि ८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता लॉटरीचा निकाल लागेल.
अर्ज भरण्यासाठी LIG साठी ५० हजार रुपये आणि MIG साठी ७५ हजार रुपये अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. याशिवाय ७०८ रुपये अर्ज शुल्क (विनापरतावा) भरावे लागेल. बांधकाम येत्या चार महिन्यांत पूर्ण होणार असल्याने लॉटरी जिंकणाऱ्यांना लवकरच घराचा ताबा मिळण्याची शक्यता आहे. इच्छुकांनी तात्काळ म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजीत बिचुकले विधान परिषदेवर पाठवा’, तृप्ती देसाईंची एकनाथ शिंदेंकडे खास मागणी
-विधानपरिषदेसाठी भाजपकडून नावांची शिफारस; अंतिम निर्णयावर दिल्लीची मोहर बाकी
-मावळ बाजार समिती वादाला राजकीय रंग; निर्णय आता मंत्रालयाच्या कोर्टात














