पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्या आणि एकेरी उल्लेख करणाऱ्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी युवासेना (शिवसेना शिंदे गट) नेते रोहित मारणे यांनी केली आहे. या पुस्तकातील आक्षेपार्ह मजकूर मराठा समाज आणि सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
रोहित मारणे यांनी पुणे पोलिस उपायुक्त परिमंडळ-१ ऋषिकेश रावले यांना याबाबत निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, या पुस्तकाचे प्रकाशक व वितरक प्रशांत आंबी यांनी वेळोवेळी हिंदू संघटनांकडून आंदोलने आणि निषेध होऊनही पुस्तकातील लिखाणात कोणतीही दुरुस्ती केलेली नाही. हिंदू बांधव आणि शिवभक्तांच्या भावनांना ठेस पोहोचवणारे हे लिखाण जाणीवपूर्वक पसरवले जात असल्याचा आरोपही मारणे यांनी केला.
“इतिहासाची मोडतोड आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका रोहित मारणे यांनी मांडली. त्यांनी पोलिस प्रशासनाला आवाहन केले की, प्रशांत आंबी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि पुस्तकावर बंदी घालावी. पोलिसांनी योग्य कारवाई न केल्यास सकल हिंदू समाज आणि मराठा समाजाच्या वतीने मोठे आंदोलन करण्याची इशारा रोहित मारणे यांनी दिला आहे. या मुद्द्यावरून पुणे शहरात राजकीय आणि सामाजिक चर्चेला उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजीत बिचुकले विधान परिषदेवर पाठवा’, तृप्ती देसाईंची एकनाथ शिंदेंकडे खास मागणी
-विधानपरिषदेसाठी भाजपकडून नावांची शिफारस; अंतिम निर्णयावर दिल्लीची मोहर बाकी
-मावळ बाजार समिती वादाला राजकीय रंग; निर्णय आता मंत्रालयाच्या कोर्टात














