पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षानुवर्षे दर शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून पुण्यातील सर्किट हाउस येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठी उपस्थित राहत. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच हाच शिरस्ता पाळणार आहेत. शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) त्या ‘व्हीआयपी सर्किट हाउस’ येथे कार्यकर्त्यांना भेटणार असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेतील बहुतांश राष्ट्रवादी सदस्य त्यांना भेटण्यासाठी येणार आहेत.
अजित पवार जवळपास १५ वर्षे पुण्याचे पालकमंत्री होते. या काळात दर शुक्रवारी ते पुण्यात कार्यकर्त्यांना भेटत आणि शनिवारी बारामतीला मतदारसंघात जात. त्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी झाली. अनेक मॅरेथॉन बैठका घेणाऱ्या अजितदादांच्या अनुपस्थितीमुळे अधिकाऱ्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांना त्यांची उणीव चांगलीच जाणवली. चुकीच्या कामावर तंबी देणारे, चांगल्या कामाचे कौतुक करणारे आणि मिश्कीलपणे चर्चा पुढे नेणारे अजितदादा आता नसल्याने बैठकेचे वातावरण वेगळे होते.
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदासह त्यांना पुणे जिल्ह्यासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदही देण्यात आले आहे. अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थखाते वगळता इतर सर्व खाती त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. शुक्रवारी सर्किट हाउसवर होणाऱ्या भेटीगाठींमध्ये पक्षातील कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमसाठी जमीन देण्याचा निर्णय झाला आहे. त्यांच्या उपस्थितीत विधानभवनातील झुंबर सभागृहात विविध बैठकाही आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूरमधील क्रिकेट स्टेडियम आणि झुंबर सभागृहाला अजित पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली आहे.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, “दिवंगत अजित पवार हे भविष्याचा वेध घेणारे दूरदृष्टीचे नेते होते. राज्याच्या प्रगतीत त्यांचे मोठे योगदान होते. पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक वेळेत सुरू करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.” अजितदादांच्या कार्यशैलीची उणीव आजही सर्वांना जाणवत असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात पक्ष नव्या दिशेने वाटचाल करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महिला नगरसेवक फक्त नामधारी, पती अन् लेकच बनले कारभारी; धायरीतल्या ‘भिडू’ची गोष्टच न्यारी
-‘एन. ए.’ परवानगी इतिहासजमा, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची संपली गरज
-निवडणुकीत घेतली पक्षविरोधी भूमिका, आता भाजपने दाखवला घरचा रस्ता; पुण्यात ६९ जणांचे निलंबन
-बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन: कुंटणखान्यांची कसून झडती, ५० घरांची तपासणी!














