पुणे : महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा धक्का दिला. कुख्यात गुंड गजानन मारणेची पत्नी जयश्री मारणे आणि बंडू आंदेकर कुटुंबातील लक्ष्मी आंदेकर व सोनाली आंदेकर यांना पक्षाने एबी फॉर्म दिला. गुन्हेगारीला आळा घालण्याचे आदेश देणारे अजित पवार आता गुंडांच्या कुटुंबीयांना तिकीट देत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आंदेकर कुटुंबाच्या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नातवाच्या खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या बंडू आंदेकरने न्यायालयाकडे निवडणूक लढवण्याची परवानगी मागितली होती. “निवडणूक लढवणे हा मूलभूत अधिकार आहे,” असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने अटींवर परवानगी दिली. त्यानंतर पक्षाने आंदेकर कुटुंबाला पाठबळ दिले.
आंदेकर कुटुंबाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे अजित पवार गटाने उमेदवारीबाबत पूर्ण गुप्तता पाळली. अधिकृत घोषणा न करता थेट अर्ज भरण्यावर भर देण्यात आला. जयश्री मारणे आणि आंदेकर कुटुंबीयांना तिकीट देऊन पक्षाने विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला; पण यामुळे नवे वाद उभे राहण्याची शक्यता आहे.
गुन्हेगारांच्या कुटुंबीयांना तिकीट देण्याच्या निर्णयाने पुण्यातील राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याचे वक्तव्य करणाऱ्या नेत्याकडून अशा उमेदवारांना पाठबळ मिळणे विरोधकांसाठी हल्ल्याचे नवे अस्त्र ठरू शकते. हा निर्णय अजित पवार गटाच्या निवडणूक रणनीतीचा भाग मानला जात आहे. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देऊन पक्षाने धाडस दाखवले आहे. पुणे महापालिका निवडणुकीत याचा परिणाम कसा होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपने उतरवले युवा नेतृत्व मैदानात, प्रभाग २५ मधून मानकर, बापट, टिळक आणि पंडित यांची उमेदवारी दाखल
-तीन दशके पक्षाशी एकनिष्ठ आता मिळाली संधी, प्रभाग २६ मधून भाजपकडून स्नेहा माळवदे यांचा अर्ज दाखल
-हर्षवर्धन मानकर प्रभाग 11 मधून महापालिकेच्या मैदानात, अर्ज भरताच मांडला विकासाचा अजेंडा
-मोहोळांना नडले अन् पालिका निवडणुकीचे सगळेच प्लॅन फसले; भाजप-शिंदे सेना युतीत खेळखंडोबा
-पठारे परिवाराची डबल ढोलकी, लेकाला भाजपमध्ये पाठवलं अन् आमदारांनी मतदारसंघाला ‘तुतारीमुक्त’ केलं














